महाज्योतीचा अनागोंदी कारभार; प्रश्नपत्रिकेतील गोंधळ दुर्दैवी : अभाविप

Pune – महाराष्ट्र राज्यात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेमार्फत इतर मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक योजना राबवल्या जातात. ३० जुलै २०२३ रोजी संस्थेकडून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग पुरवण्यासाठी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र भरातील विद्यार्थ्यांनी विविध केंद्रावर जाऊन ही परीक्षा दिली, मात्र या परीक्षेच्या बाबतीत एक अजब प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे येथील ज्ञानदीप या खाजगी शिकवणीकडून पूर्वी घेण्यात आलेल्या चाचणी मालिकेतील प्रश्न जसेच्या तसे या परीक्षेत विचारण्यात आले, ही अतिशय गंभीर बाब आहे. यातून संस्थेच्या प्रशासकांना नेमकं काय साध्य करायचे आहे? या खाजगी शिकवणी मधील विद्यार्थ्यांनाच महज्योतीला सामावून घ्यायचे आहे का? असे प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत आहेत. यापूर्वी ही अशाच प्रकारच्या युपीएससी पूर्व प्रशिक्षण निवड परीक्षेत मास कॉपी झाल्यामुळे सदरील पेपर रद्द करण्याची नामुष्की महाज्योतीवर आली होती. वारंवार अशा घटना होत असताना, संबंधित खात्याचे मंत्री मात्र या सर्व प्रकरणांकडे दुर्लक्ष करत आहेत.

या घटनेमुळे महाराष्ट्रातील इतर मागास वर्गातील विद्यार्थी मात्र नाहक भरडला जात आहे.  या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच महाज्योतीने स्वतंत्र परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी नवीन यंत्रणा सुरू करावी.. पुढील पंधरा दिवसात सदर परीक्षा पुन्हा घेऊन निकाल लावण्यात यावेत. या परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीप्रमाणे शिकवणी निवडण्याची संधी देण्यात यावी. या सर्व मागण्या शासनाने तत्काळ पूर्ण कराव्यात व महाज्योती या संस्थेच्या अनागोंदी कारभारावर तत्काळ आळा घालावा, अन्यथा शासनाला विद्यार्थ्यांच्या रोषला सामोरे जावे लागेल,  से मत पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केले.