‘मोदी भक्त’ मनोज मुंतशीर बरळला; म्हणाला, ‘हनुमान देव नव्हते, राम भक्त होते, त्यांना…’

Adipurush : ‘आदिपुरुष’चे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) या चित्रपटासाठी लिहिलेल्या संवादांमुळे आधीच लोकांच्या धारेवर आहे. आणि आता त्याने आणखी एक दावा करून आपल्या अडचणीत भर घातली आहे. हनुमानजी हे देव नव्हते तर राम भक्त होते.. आपण त्यांना देव बनवले.., असे मनोज मुंतशीरने म्हटले आहे.  यामुळे तो पुन्हा एकदा लोकांच्या निशाण्यावर आला आहे.

‘आदिपुरुष’च्या संवाद आणि दृश्यांवरून बराच गदारोळ झाला होता. विशेषत: हनुमानजींच्या व्यक्तिरेखेसाठी लिहिलेल्या संवादांवरून गदारोळ झाला आहे. चित्रपटात हनुमानजीचे पात्र “तेल तेरे बाप का, कपरा तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की” असे म्हणताना दाखवण्यात आले आहे. या संवादांवर स्वत:चा बचाव करताना मनोज मुंतशीरने एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिले.

मनोज मुंतशीर म्हणाले, ‘बजरंग बलीसाठी सरळ भाषेत संवाद लिहिण्यामागील आमचे एक ध्येय होते ते म्हणजे बजरंगबली, ज्यांना आपण शक्ती, बुद्धिमत्ता आणि विद्येचा देवता मानतो. ज्या बजरंगबलीकडे डोंगरासारखे बळ आहे, ज्याचा वेग शेकडो घोड्यांचा आहे, तेच बजरंगबली लहान बालकासारखे आहेत. त्यांचा बालसुलभ स्वभाव असा की प्रत्येकाला हसू फुटते. ते श्रीरामांसारखे बोलत नाहीत. ते तात्विक बोलत नाही. बजरंगबली हे देव नाही, ते भक्त आहेत. त्यांच्या भक्तीत शक्ती होती म्हणून आपण त्यांना नंतर देव बनवले.’

मनोज मुंतशीरची ही मुलाखत पाहून लोक आणखी संतप्त झाले आहेत आणि त्यांना मुलाखत न देण्याचा सल्ला देत आहेत. ट्विटरवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.