‘आज निवडणुका झाल्या तर MVA १८० ते २०० जागा जिंकेल; राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल’

नवीन निवडणूक सर्वेक्षणात लोकांच्या खऱ्या भावना नाहीत...

मुंबई – आज राज्याच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) १८० ते २०० जागा जिंकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे.

न्यूज एरिना इंडियाने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांची खरी भावना दिसून येत नाही, असे स्पष्ट मत महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.

भाजपनेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत पक्षांतर घडवून आणले आणि महाविकास आघाडी सरकार पाडले हे राज्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच नव्हे, तर राज्यातील आणि राष्ट्रीय निवडणुकांमध्येही भाजपला धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार वाट पाहत आहेत असा दावाही महेश तपासे यांनी केला आहे.

भाजपच्या अंतर्गत पाहणीतही महाराष्ट्रातील ईडी सरकारच्या कामचुकारपणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ईडी सरकारच्या गोंधळी कारभाराने प्रशासन ठप्प झाले आहे त्यामुळेच कल्याणकारी राज्याची संकल्पना केवळ कागदावरच आहे, अशी टीकाही महेश तपासे यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला साफ नाकारले गेले आहे परंतु भाजप महाराष्ट्राप्रमाणेच पक्षांतरासारखे अन्यायकारक मार्ग वापरून पुन्हा सत्तेवर आला आहे असेही महेश तपासे म्हणाले.