ढाण्या वाघ पुन्हा मैदानात; आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा दौऱ्यांचा सपाटा

नाशिक – आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार तयारी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे आता महाराष्ट्र दौरा करणार आहेत.  राज्यभरात जाऊन कार्यकर्ते, नेत्यांचं जाळं विस्तारण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा काही मोठी पावलं उचलणार आहेत.

पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या शहरी भागापलीकडेही मनसे आपला विस्तार करण्यासाठी मोठी रणनीती आखत आहे. राज ठाकरे राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करणार असून यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. सध्या मुंबई ,पुणे आणि नाशिककडे मनसेनं जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे. आज नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधून दौऱ्याचा शुभारंभ करतील.

यानंतर मंगळवारी राज ठाकरे औरंगाबादेत सकाळी 10 वाजता मराठवाड्यातील पदाधिकारी यांच्यासौबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता सागर लॉन येथे दिलीप चितलांगे यांच्या वर्तमान पत्राचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होणार आहेत. 15 आणि 16 डिसेंबरला ते पुण्यातल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी 17 डिसेंबरला सकाळी 10 वाजता कोंढवा, पुणे येथील साईनाथ बाबर यांच्या ई लर्निंग शाळेचे उद्घाटन करणार आहेत.