‘आदिपुरुष’चे दिग्दर्शक ओम राऊत यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून संरक्षण

Om Raut Death Threat : ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट सतत चर्चेत असतो. या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. VFX पासून ते डायलॉग्स पर्यंत सगळ्याच गोष्टींवर लोकांचा राग अनावर झालेला दिसतोय. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यानंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत (OM Raut) यांच्यासह मनोज मुंतशीर (Manoj Mantashir) यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

अलीकडेच मनोज मुंतशीर यांनी ‘आदिपुरुष’ यावरून वाढत चाललेला वाद पाहता आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण देत मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. मनोजनंतर आता या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनाही पोलिसांनी सुरक्षा पुरवली असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओम राऊतसोबत चार कॉन्स्टेबल आणि एक सशस्त्र पोलिस त्यांच्या कार्यालयात तैनात करण्यात आला आहे.

प्रभास, क्रिती सॅनन, सैफ अली खान आणि देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. 16 जून रोजी रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. काही प्रेक्षकांच्या आक्षेपानंतर रविवारपासून चित्रपटाचे संवाद बदलण्यात आले. मात्र, नवीन संवादही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले नाहीत.