डंके की चोट पे! ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्याचं सांगत सदावर्तेंचा पवारांवर हल्लाबोल

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि तत्कालीन महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केल्याचा आरोप असणाऱ्या ११८ राज्य परिवहन महामंडळाच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

याबाबत बोलताना वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यात आली. त्यांना कष्टकऱ्यांप्रती कळवळा आहे. त्यासाठी त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला म्हणून ११८ कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावरून उद्धव ठाकरे सरकारने त्यांना नोकरीवरून काढलं होतं.

पवार कायम म्हणत होते की या कामगारांचे गिरणी कामगार होतील. विरोधी पक्षाचे पुढारी अजित पवार यांनी बघावं की, एकूण ९२ हजार कष्टकऱ्यांचाही गिरणी कामगार झाला नाही आणि ११८ कर्मचारीही डंके की चोटपर कामावर रुजू झाले, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.