गॅस हजारपार सामान्य बेजार! सामान्य माणूस पुन्हा गॅसवर! यावर बोला की मोदी सरकार 

मुंबई : देशातील जनहिताच्या संघर्ष लढ्यात नेहमी आक्रमक असलेल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांनी केंद्र सरकार विरोधात एक ट्विट (Tweet) केले आहे. देशातील एकूणच परिस्थिती पाहाता वाढत्या महागाई विरोधात अतिशय खोचक शब्दातील ट्विट करीत त्यांनी मोदी सरकाराला (Modi Government) सामान्यांच्या प्रश्नांबाबत जाब विचारला आहे.

“ सिलेंडर हजारपार, सेन्सेक्सही गपगार, रुपया झाला निराधार, सामान्यांचं जगणं झालं बेजार! याला कोण जबाबदार ? यावर बोला की मोदी सरकार?” असे सूचक ट्विट करीत सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देतानाच त्यांनी  वाढत्या महागाई (Inflation)वर केंद्रातील मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे. देशातील स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर १००२.५० एवढा महागला आहे, सेन्सेक्स ही आता १.४१६ अंशांची घसरण झाली आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत ऐतिहासिक नीच्चांकावर म्हणजे ७८ जवळ पोहचला आहे.

देशात पेट्रोल डिझेलसह (Petrol-Diesel) अगदी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह विविध सेवांमधील दरवाढीने त्रस्त झाल्याने सामान्यांचे जगणे बेजार झाले आहे. त्यातच सिलेंडरची किमत एकाच महिन्यात दोन वेळा वाढून (Cylinder prices hiked twice within a month) पहिल्यांदाच एक हजार पार पोहचली आहे. मोदी सरकार आणि त्यांचे मंत्री यावर काहीही न बोलताना दिसत नाही. महत्वाचे मुद्दे आणि सामान्यांचे रोजचे जगणे अवलंबून असलेल्या गोष्टींना बगल देत धर्म आणि मंदिरांचे राजकारण करीत फिरत आहेत. जनतेकडून पैसे लुटून आपले ‘ग्राफ’ नीट करायच्या मागे लागलेल्या मोदी सरकारने यावर भाष्य करावे असे ट्विट ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकार विरोधात केले आहे.