समर्थांसाठी प्रभु श्रीरामानंतर आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज : सरसंघचालक

श्रीसमर्थ रामदास लिखित वाल्मिकी रामायणाचाच्या संपादित खंडांचे थाटात प्रकाशन

पुणे – समाजाला दिशा दाखविण्यासाठी आदर्श राजाचे रूप ठेवणे आवश्यक होते. प्रभु श्रीरामाच्या नंतर श्री समर्थांनी आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ठेवलेले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Sarsangchalak of Rashtriya Swayamsevak Sangh Dr. Mohan Bhagwat) यांनी बुधवारी केले. श्रीसमर्थवाग्देवता मंदिर, धुळें या संस्थेच्या वतीने श्रीसमर्थरामदासस्वामिलिखित वाल्मीकिरामायण या ग्रंथाच्या मूळ सात बाडांचे कांडशः संपादन करून बनविण्यात आलेल्या आठ खंडाचे राष्ट्रार्पण सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या आठ खंडांमध्ये मुळ हस्तलिखितासमवेत मराठी आणि इंग्रजीत त्याचा अनुवाद मांडण्यात आला आहे.

व्यासपीठावर श्रुतिसागर आश्रम, फुलगांव येथील स्वामी स्वरूपानंद सरस्वती, श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगडचे बाळासाहेब स्वामी, रा. स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, श्रीसमर्थवाग्देवतामंदिर, धुळें संस्थेचे अध्यक्ष अनंत चितळे आदींची उपस्थिती होती तर कार्यक्रमास कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे, सत्कार्योत्तेजक सभा, धुळेचे अध्यक्ष विश्वास नकाणेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य अनिरूद्ध देशपांडे, सुहासराव हिरेमठ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सरसंघचालक पुढे म्हणाले की,  समर्थांच्या वेळची परिस्थिती आक्रमणाची होती. लढाई हा धर्माच्या संरक्षणाचा केवळ एक भाग आहे. मात्र केवळ लढाई म्हणजे धर्माचे संरक्षण नव्हे. प्रतिकार, प्रबोधन, संशोधन आणि आचरण हे ही धर्माचे संरक्षण आहे. हे सर्व श्रीरामांनी केले. श्रीराम हे आराध्य त्या वेळेच्या जवळजवळ सर्व संतांनी समाजासमोर ठेवले. शाश्वत धर्म काळानुसार कसा पाळावा हे सांगावेही लागते आणि दाखवावेही लागते. समाजाला एकत्र करणे, त्यासाठी प्रवास करणे आणि संवाद साधणे याची कालसुसंगत रचना समर्थांनी केली.

ते म्हणाले,  आपल्या समोर प्रश्न आहेत. या प्रश्नांसाठी दोन हजार वर्षांत आपण प्रयोग करून थकलो. आता सर्व उत्तरं भारत देईल, ही आशा जगाला आहे. जगाला भारताकडून अपेक्षा आहेत पण भारतीयांना याची जाणीव आहे का, हा प्रश्न आहे. आता गुलामी नसली तरी गुलामगिरीची वृत्ती अजून आहे.  राष्ट्रजागृतीचे कार्य सध्या देशात सुरू आहे. ते राष्ट्रव्यापी झाले आहे. मात्र भारतात बुद्धिजीवी क्षत्रियांची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी त्यासाठी तयार राहायाला हवे, असेही आवाहनही सरसंघचालकांनी यावेळी केले.

संस्थेचे माजी अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख शरद कुबेर यांनी या ग्रंथाच्या निर्मितीची प्रक्रिया विषद केली. प्रास्ताविक प्रा. देवेंद्र डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अरविंद जोशी यांनी तर प्रार्थना गायन दीपा भंडारे यांनी केले. विनय खटावकर यांनी आभार प्रदर्शन केले.