रेशनच्या दुकानात PM मोदींचा फोटो का नाही? निर्मला सीतारामन अधिकाऱ्यांवर भडकल्या 

नवी दिल्ली –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेलंगणाच्या दौऱ्यावर असताना रेशनच्या दुकानांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्यावरून त्या संतापल्या. लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत त्यांनी तेंलगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील बिरकु़र या गावी भेट दिली. त्याठिकाणी काही नागरिकांशी चर्चा करत असताना रेशनाच्या दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याचं त्यांना आढळलं. यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा सुद्धा केली. यावेळी त्या चांगल्याच संतापल्या आणि अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

बाजारात एका किलो तांदळाची किंमत ३५ रुपये आहे. तो तुम्हाला १ रुपयांना दिला जातो. केंद्र सरकार ३० रूपये खर्च उचलते, तर राज्य सरकार फक्त ४ रूपये खर्च देते. करोना महामारी सुरू झाल्यापासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पाच किलो तांदूळ मोफत दिला जात आहे. मात्र, तेलंगणातील सरकार रेशन दुकानांमध्ये पंतप्रधान मोदींचे फोटो लावत नाही. पंतप्रधानांचे बॅनर लावले जातात, तेव्हा ते फाडण्यात येतात. पंतप्रधानांचा फोटो रेशन दुकानात का नाही, असा सवाल करत अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.