नितेश राणे जिथे दिसतील तिथे तोंडाला काळं फासणार; तृतीयपंथी समाज आक्रमक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंवर पातळी सोडून टीका केली. मर्दानगी वर कलंक! हिजड्यांच्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा.. बायला कुठला!! असं ट्वीट करत नितेश राणे यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडत टीका केली आहे.

निलेश राणे यांनी तृतीयपंथींवरुन केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात मध्यरात्री बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे तृतीयपंथींनी मध्यरात्रीपासून आंदोलन सुरु केले आहे. नितेश राणे जिथे दिसतील, तिथे त्यांच्या तोंडाला काळं फासणार, अशी आक्रमक भूमिका तृतीयपंथी समाजातील लोकांनी घेतली आहे.

सकाळी आंदोलन सुरु असताना पोलीस आणि तृतीयपंथी यांच्यात झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.