‘घराणेशाहीला संपवल्याचं ज्वलंत उदाहरण महाराष्ट्र आहे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचं मोठं उदाहरण आहेत’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर टीकास्त्र सोडले. काका-पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देण्याची गरज यावेळी मोदींनी (PM Modi speech) व्यक्त केली.

काका-पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देण्याची गरज आहे. मी घराणेशाहीविरोधात बोलतो तेव्हा लोकांना वाटतं की, मी फक्त राजकीय विधानं करतो. पण तसं नसून घराणेशाहीच्या आणि काका-पुतण्याच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान होत आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे कुटुंबांना पोसलं जातं. या दुर्भाग्यपू्र्ण्य परिस्थितीचा भारताला फटका बसत आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

मोदींचे हेच भाषण विरोधकांना चांगलेच झोंबले असताना अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी सुद्धा या मुद्यावर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही संपवली पाहिजे असं मत व्यक्त केलं. त्या वक्तव्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “घराणेशाहीला संपवल्याचं ज्वलंत उदाहरण महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्याचं मोठं उदाहरण आहेत. त्यांनी घराणेशाही संपवण्यासाठी महाराष्ट्रातून एक पाऊल पुढे टाकलं आहे.”