“चारशे लोक एका टॉयलेटमध्ये, जगणं कठीण झालं होतं..” अभिनेता एजाज खानने सांगितला तुरुंगातील अनुभव

Azaz Khan Jail Experience: बॉलीवूड अभिनेता एजाज खानला (Azaz Khan) 2021 मध्ये एनसीबीने मुंबई विमानतळावर ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतले होते आणि त्याच वर्षी मार्चमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, अभिनेत्याने तुरुंगातील त्याचा अनुभव सांगितला.

मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, एजाज खान म्हणाला की, ‘तुरुंगातील एक दिवस वर्षभरासारखा वाटतो. ज्या व्यक्तीने माझ्यावर केस केली त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही आणि जग त्याच्यासोबत काय झाले ते पाहत आहे. निकाल लागण्यापूर्वीच मला दोषी घोषित करण्यात आले. अखेरीस मला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला, पण मी 26 महिने तुरुंगात होतो आणि माझे काम चुकले आणि माझा मुलगा मोठा झाला.’

एजाज खानने तुरुंगातील त्याच्या खडतर जीवनाविषयी पुढे सांगितले की, ‘आर्थर रोड जेल हे कदाचित जगातील सर्वात जास्त गर्दीचे तुरुंग आहे, जिथे 800 कैद्यांच्या क्षमतेच्या तुलनेत 3,500 लोक तुरूंगात आहेत. एका शौचालयात 400 लोक जातात. त्या शौचालयातील परिस्थितीची कल्पना करा. त्यावेळी मी चिंता आणि नैराश्यातून गेलो होतो. हे कठीण होते पण मला माझ्या कुटुंबासाठी जगायचे होते. माझ्या कुटुंबात 85 वर्षांचे वडील, पत्नी आणि मुलगा आहे.’

‘राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, संजय राऊत, अरमान कोहली, आर्यन खान आणि राज कुंद्रा यांच्यासह अनेक लोकांना मी तुरुंगात भेटलो. तुमच्या शत्रूनेही यातून जावे असे तुम्हाला वाटणार नाही. मी सुरुवातीला माझ्या मुलाला भेटण्यास नकार दिला कारण त्याने मला तुरुंगात पाहावे अशी माझी इच्छा नव्हती, पण शेवटी सहा महिन्यांनी त्याला भेटलो कारण त्याने माझी कहाणी जाणून घ्यावी आणि जगासाठी मजबूत व्हावे अशी माझी इच्छा होती. तो आता ठीक आहे आणि एक चांगला फुटबॉलपटू बनत आहे,’ असे शेवटी एजाजने सांगितले.