अजितदादांकडून आमदारांवर निधीचा वर्षाव, शिंदेंच्या नाराज आमदारांनाही दिला भरघोस निधी

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडाचे निशाण फडकावत भाजप -शिवसेनेच्या सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे सहकारी आमदार सामील झाले. यानंतर अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आल्या. सुरुवातीला शिंदे गटाचा अर्थ खाते अजित पवारांकडे द्यायला विरोध होता मात्र तरीही हे खाते पवारांकडे देण्यात आले. मागील सरकारच्या काळात अजित पवार आपल्याला निधी देत नाहीत अशी शिंदे गटातील आमदारांची मुख्यतः तक्रार होती मात्र आता अर्थमंत्री झाल्यावर अजित पवारांनी मागील चुका टाळल्याचे दिसत आहे.

अजित पवारांनी अर्थखात्याचे सूत्रे हाती घेताच आठवडाभरात राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीचा वर्षाव केलाय. अजित पवारांनी आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला असून, त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद केलीय.

शिंदे गटाच्या काही आमदारांनाही निधी मंजूर करत त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न अजित पवारांनी केलाय. विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय.