आई-वडील लग्न करुन देत नसल्याने ‘तो’ चोरायचा महिलांची अंतर्वस्त्रे

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून वाळूज परिसरात राहणाऱ्या महिला एका वेगळ्याच अडचणीचा सामना करत होत्या. या परिसरात राहणाऱ्या महिलांची अंतर्वस्त्रे चोरीला जाण्याचा प्रकार सुरु होता. आता या गोष्टीची चर्चा आणि तक्रार तरी कशी आणि कुणाकडे करणार असा देखील प्रश्न या महिलांच्या समोर होता. या परिसरातील महिलांनी याबाबत कुटुंबियांशी चर्चा केली मात्र गोष्ट छोटी असल्याने याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वारंवार घडणारे हे प्रकार गांभीर्याने घेत काही नागरिकांनी नेमका प्रकार काय होतोय हे जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही लावले. यात एक चोर महिलांची अंतर्वस्त्रे चोरी करत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे अंतर्वस्त्रे चोरल्यावर तो एखाद्या घरात डोकायचा. तर असे करताना तो अश्लील चाळे देखील करायचा.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास सारा वृंदावन सोसायटीसमोर बसलेल्या तरुणांना सीसीटीव्ही फुटेजमधील दिसलेला संबंधित भुरटा चोर जाताना दिसला आणि त्याला नागरिकांनी ताब्यात घेतले. यानंतर नागरिक मोठ्याप्रमाणात जमा झाले. महिला व नागरिकांनी त्याची चांगलीच धुलाई केली.

दरम्यान याबाबत वाळूज पोलिसांना माहिती मिळताच दामिनी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्या विकृत तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव सचिन सारंग दिंडोरे असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे आई-वडील लग्न करुन देत नसल्याने आपण असे कृत्य केल्याचे त्याने पोलीस तपासात कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.