शरद पवार- गौतम अदानी भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ओळखीच्या व्यक्तीने…’

मुंबई- अदानी समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. अदानी यांनी पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार यांनी नुकतेच हिंडेनबर्ग अहवालाच्या मुद्द्यावरून अदानींना पाठिंबा दर्शवला होता, ज्यानंतर आता अदानींनी त्यांची भेट घेतल्याने (Gautam Adani Meets Sharad Pawar) चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते, ते म्हणाले की, शरद पवारांनी अदानीची भेट घेतली नाही तर अदानी शरद पवार यांच्याकडे आले होते, यांच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती आपल्याला नाही, अजून त्यांच्यावरचा आरोप सिध्द झाला नाही.

सुप्रिम कोर्टाने तपासासाठी समिती नेमली आहे त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी ठरतील. शरद पवार आणि अदानी यांची ओळख आहे, ओळखीच्या व्यक्तीने ओळखीच्या व्यक्तीशी भेटलं तर यात काही गैर नाही. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.