आता तुम्ही जितके अधिक देशभक्त असाल, तितके लोकप्रिय व्हाल; नसिरुद्दीन शाह यांचं वक्तव्य चर्चेत

Naseeruddin Shah: सनी देओल स्टारर गदर २ (Gadar 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. देशभक्तीवर आधारित या सिनेमाने पुन्हा एकदा सिनेरसिकांना वेड लावून सोडले. मात्र जेष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी गदर २ सह द काश्मिर फाईल्स, द केरला स्टोरी या सिनेमांवर ताशेरे ओढले आहेत. असे चित्रपट हिट होताना पाहून खूप त्रास होतो, असे ते एका मुलाखतीत म्हणाले.

हल्ली बॉलीवूडमध्ये एक उद्देश समोर ठेवून चित्रपट बनवले जातात. जितके तुम्ही देशभक्तीवर आधारित सिनेमे बनवाल, तितके ते प्रसिद्ध होतील, अशी प्रतिक्रिया नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah On Gadar 2) यांनी दिली आहे.

बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्यामागचा उद्देश बदलला आहे का? असा प्रश्न विचारला असता नसीरुद्दीन शाह यांनी मोकळेपणे आपलं मत मांडलं. “हो, आता तुम्ही जितके अधिक देशभक्त असाल, तितके अधिक तुम्ही लोकप्रिय व्हाल. कारण सध्या देशात त्याच गोष्टीचं राज्य आहे. आता फक्त तुमच्या देशावर प्रेम करणं पुरेसं राहिलेलं नाही. पण जोरजोरात ढोल वाजवून आणि काल्पनिक शत्रू निर्माण करून तुम्हाला ते सिद्ध करावं लागतंय. या लोकांना ही गोष्ट समजत नाहीये की ते जे करत आहेत ते खूप हानीकारक आहे”, असं ते म्हणाले.

“द केरळ स्टोरी आणि गदर २ यांसारखे चित्रपट मी पाहिले नाहीत पण मला माहीत आहे की ते कशाबद्दल आहेत. द काश्मीर फाइल्ससारखा चित्रपट इतका लोकप्रिय होत असल्याचं पाहून खूप त्रास होतो. दुसरीकडे सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा आणि हंसल मेहता हे जेव्हा चित्रपटांमधून सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना लोकप्रियता मिळत नाही. पण हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की असं असूनही ही लोकं चित्रपटांद्वारे त्यांच्या कथा सांगण्याचं काम थांबवत नाहीयेत”, असंही शाह म्हणाले.

“चांगले दिग्दर्शक हे चांगली पिढी घडवण्यासाठी जबाबदार असतात. शंभर वर्षांनंतर लोक ‘भीड’ हा चित्रपट पाहिल्यानंतर जेव्हा ‘गदर २’ पाहतील, तेव्हा आपल्या काळातील कोणत्या चित्रपटातून सत्य मांडलंय हे ते जाणून घेतील. कारण चित्रपट हे एकमेव माध्यम आहे, ज्यामधून हे साध्य होऊ शकतं. आयुष्य जसं आहे तसं दाखवणं खूप कठीण आहे. त्यामुळे सध्या जे चाललंय त्याला प्रतिगामी हा अत्यंत सौम्य शब्द आहे. जिथे सर्व चुकीच्या गोष्टींचं कौतुक केलं जातं आणि इतर समुदायाला कोणत्याही कारणाशिवाय खाली पाडलं जातं. हा खूप भयानक ट्रेंड आहे.” असं बेधडक मत शाह यांनी मांडलं.

महत्वाच्या बातम्या-

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, पगार 47,900 रुपयांपर्यंत असणार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख; अवघ्या १४ महिन्यात १३,००० हुन अधिक रुग्णांना ११२ कोटी १२ लाखांची मदत वितरित