1993 साली लाट असूनही शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले? फडणविसांनी सांगितले नेमके कारण

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल पुन्हा भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना त्यांनी पुन्हा शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडलो असा पुनरुच्चार केला होता. यावर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी भाष्य केलं असून त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलीय.

फडणवीस म्हणाले, सोयीचा इतिहास मांडणे आणि सोयीस्कर विसर या दोन बाबी उद्धव ठाकरे यांच्या भाषणात पाहायला मिळाल्या. भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय हा वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला. त्यांच्या निर्णयावर प्रश्न विचारून त्यांच्या जयंतीला अपमान का करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुंबईत पहिला नगरसेवक हा भाजपचा, शिवसेनेचा नाही. तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी आमचा मुंबईत नगरसेवक होता, आमदार होतेविधानसभेची पहिली निवडणूक शिवसेनेने लढविली, ती भाजपाच्या चिन्हावर. कशाला बाता मारता ? तुमचे हिंदुत्व कागदावरचे. हिंदुत्व बोलून चालत नाही, ते जगावे लागते. राम मंदिर, काशी विश्वनाथ, 370 असे निर्णय घेतले कुणी.नरेंद्र मोदीजी यांनी. तुमची तर संदिग्ध भूमिका होती 370 वर असं ते म्हणाले.

1993 मध्ये उत्तर प्रदेशात शिवसेनेचे 180 उमेदवार लढले होते त्यापैकी 179 उमेदवारांचं डिपॅाजिट जप्त झालं होतं. तुम्हाला जनतेनं तेव्हाही नाकारलं होतं. कारण राम मंदिराच्या आंदोलनात कारसेवक होते, असं ते म्हणाले. १९९६ साली २४ पैकी २३ जागी, २००२ सालच्या निवडणुकीत ३९ पैकी ३९ जागी शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले होते. म्हणे त्यावेळी लाट होती, कशाला खोटे बोलता? असा घणाघात फडणवीस यांनी केला. शिवसेना जोवर आमच्यासोबत होती, तोवर पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होती. आज चौथ्या क्रमांकावर आहात. कुणासोबत युतीत सडले, हे दिसतेच आहे असे ते म्हणाले.