अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ? राष्ट्रवादीच्या आमदारानेच दिले संकेत 

मुंबई – एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अजित पवारांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अजित पवारांची राजकारणात काम करण्याची स्टाईल, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची कार्यशैली त्यातून दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओला ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने खास अंदाजात अमोल मिटकरी यांनी अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमोल मिटकरी यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते शिंदे गटाचे सर्वच नेते आगामी निवडणुका शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचं सांगत आहेत. एकनाथ शिंदे हेच 2024नंतरही मुख्यमंत्री असतील असं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. असं असताना अमोल मिटकरी यांनी ट्विट करून नव्या वादाला सुरुवात करून दिली आहे.