अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

कार्यकर्ते व भाविकांच्या भावनांचा आदर करणार ; हुतात्मा बाबू गेनू मंडळ आणि श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट या मंडळाचा देखील सहभाग

पुणे : अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळासह हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ व श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ ट्रस्ट ही पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे नियोजित वेळेत म्हणजेच सायंकाळी ६ नंतर विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. कार्यकर्ते आणि भाविकांच्या भावना विचारात घेऊन दरवर्षीप्रमाणेच यंदाही नियोजित वेळेत विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ ट्रस्टचे बाळासाहेब मारणे, श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्टचे भूषण पंड्या आदी उपस्थित होते.

अण्णा थोरात म्हणाले, पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करीत सर्व शिस्त पाळून लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपविण्याचा सर्व मंडळांचा प्रयत्न राहील. दरवर्षीच्या नियोजित वेळेपेक्षा आधी निघणे मंडळांना शक्य होत नाही. मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुकीनंतर इतर गणपती मंडळे लक्ष्मी रस्त्याने मिरवणुकीमध्ये मार्गस्थ होतात. त्यामुळे ती मंडळे पुढे जाईपर्यंत इतर मंडळांना लवकर जाणे शक्य नाही. त्याकरिता आम्ही नेहमीच्या वेळेतच सहभागी होणार आहोत.

पुनीत बालन म्हणाले, विसर्जन मिरवणुकीकरिता सायंकाळी सहभागी होत असलेल्या प्रमुख मंडळांनी केलेली सजावट व विद्युतरोषणाई हे सायंकाळ नंतरचे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असते. ते पाहण्यासाठी लाखो भाविक देशभरातूच नव्हे, तर जगभरातून येतात. त्यामुळे त्या सर्वांच्या भावनांचा विचार करता ठरलेल्या वेळेतच सायंकाळी मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. तसेच सर्व प्रकारची शिस्त पाळत विसर्जन मिरवणूक होईल.

बाळासाहेब मारणे म्हणाले, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळाची सजावट व विसर्जन रथ हे आकर्षण असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच मंडळ यंदा देखील सायंकाळी मिरवणुकीत सहभागी होणार आहे. उत्सव मंडपापासून सायंकाळी ६.४५ वाजता आरती करून विसर्जन मिरवणुकीत मंडळ सहभागी होईल.

भूषण पंड्या म्हणाले, श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ सायंकाळी ६.३० नंतर मिरवणुकीत सहभागी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या मंडळा मागे हुतात्मा बाबू गेनू गणपती, भाऊ रंगारी गणपती आणि त्यापाठोपाठ अखिल मंडई मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होईल. भाविकांच्या भावना विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून सर्व शिस्त पाळून मिरवणूक लवकर संपविण्याकरिता आम्ही देखील सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई महापालिकेचे भूखंड व उद्याने दत्तक देण्याचे धोरण रद्द करा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

वंचित बहुजन आघाडीचा Gautam Adani – Sharad Pawar भेटीवरून कॉंग्रेसला टोला !

ससूनमधील रुग्णांना ‘Virtual Reality’द्वारे ‘दगडूशेठ’ बाप्पाचे दर्शन