‘बारदेझचा बादशाह’ होण्याच्या महत्त्वाकांक्षामुळे मायकल लोबो यांना धोक्याची घंटा !

काँग्रेसचे स्थानिक नेते अस्वस्थ, मायकेल विरोधीगटाची वज्रमूठ

पणजी : भारतीय जनता पार्टीसोबत सुमारे १० वर्षे सत्तेतील विविध पदांचा लाभ घेतलेल्या मायकल लोबो यांना ‘बार्डेजचा बादशाह’ होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. बार्डेजमधील प्रमुख बाजारपेठ असलेल्या म्हापसाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजकीय कुरघोड्या आणि अनावश्यक हस्तक्षेप करण्याची भूमिका ठेवल्यामुळे लोबो एकाधिकारशाही राबवत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर असल्यामुळे लोबो यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

कळंगुट मतदार संघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री मायकल लोबो यांनी भाजपाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना उमेदवारीही जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसच्याच नेत्यांनी बंड पुकारले आहे. माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, जोजफ सिक्वेरा, तसेच अँथोनी मिनेझीस यांनी लोबोंचा पराभव हेच एकमेव उद्दीष्ट ठेवले. दुसरीकडे, लोबोंची रिक्त जागा भरुन काढण्यासाठी भाजपा तेवढ्याच ताकदीचा उमेदवार मैदानात उतरवणार आहे.

गोवा विधानसभेची निवडणूक ही काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भाजपा तसेच आप या चार पक्षांमध्ये सरळ होणार आहे. कळंगुटमधून टिटोसचे मालक रिकार्डो डिसोझा यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कळंगुटची निवडणूक अतितटीची होणार आहे.

दरम्यान, मायकल लोबो यांचा बोर्डेजमधील ग्रीन झोनमधील जमिनींवर डोळा आहे. संबंधित जागांचा आपल्या विचारांच्या आमदारांकरवी आर्थिक फायद्यासाठी बळकावण्याची अपेक्षा आहे. तसेच, अवैध धंद्यांना पाठबळ मिळवून घेण्यासाठी कळंगुटसह बार्डेजच्या थिवी, शिवोली, म्हापसा, अलडोना, सालीगाव, परवरी अशा सात विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. काँग्रेसमध्ये प्रवेश करुन आपल्या विचारांचे आमदार विधानसभेत पाठवून बार्डेजमध्ये वर्चस्व मिळवण्याची रणनिती लोबो यांनी आखली आहे. मात्र, काँग्रेससह सर्वपक्षीय नेते लोबो यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.

जोशुआ डिसोझा ऑन ‘फायर मोड’

बार्डेजमधील कळंगुट मतदार संघातून मायकल लोबो यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. असे असतानाही लोबो म्हापसामध्ये लक्ष घातल आहेत. स्थानिक मुद्यांवर हस्तक्षेप करुन मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गोवा भाजपा निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेवूनही भाजपाविरोधी भूमिका घेत लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेत्यांचीही त्यांनी नाराजी ओढावून घेतली आहे. भाजपाकडून बार्डेजमधील साळीगावमधून जयेश साळगावकर, थिवीमधील निळकंठ हळणकर, शिओलीममधून दयानंद मांदरेकर, परवरीमधून रोहन खवटे, अलडोनामधून ग्लेन सोझा टिकलो आणि म्हापसामधून मी स्वत: उमेदवार म्हणून रिंगणात आहे. भाजपाकडून कळंगुटची उमेदवारी जाहीर झाल्यावर आम्ही भाजपाचे सातही उमेदवार एकजुटीने कळंगुटमध्ये लक्ष घालणार आहोत. म्हापसामध्ये लोबो हस्तक्षेप करीत असतील, तर आम्हीसुद्धा कळंगुटमध्ये आक्रमकपणे लढा देणार आहोत, असा इशारा म्हापसा विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार आमदार जोशुआ पीटर डिसोझा यांनी दिला आहे.