लोकशाही टिकवण्यासाठी आंबेडकरी चळवळीला मोठा लढा उभारावा लागेल – अर्जुन डांगळे

- आंबेडकरी चळवळीत मातंग समाजाचे योगदान या विषयावर पुण्यात राजयस्तरीय चर्चासत्राचे आयोजन -

पुणे  –  डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) मानवमुक्ती लढ्याचे उद्धगाते होते . भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान न्याय दिला आहे .लोकशाहीचे सामाजिकीकरण होणे गरजेचे आहे परंतु सद्या धर्म आणि इतर विविध विषयावर लक्ष वेधले जात आहे .त्यामुळे आता दलीत समाजाने आणि बहुजन समाजाने मतभेद बाजुला ठेवून लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र येऊन मोठा लढा उभारणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक ,विचारवंत अर्जुन डांगळे (Arjun Dangle) यांनी व्यक्त केले. ते पुण्यात महाराष्ट्र साहीत्य परिषदेच्या सभागृहात डॉ.सोमनाथ कदम लिखित आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

पुढे ते म्हणाले की , मातंग समाज हा सुरुवातीपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहे .डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एका जातीचे अथवा धर्माचे नव्हते ते साऱ्या जगातील उपेक्षित ,वंचित आणि सर्वांचे होते .त्यामुळे दलित ,बहुजन समाजातील दुर्लक्षित समाजाला बरोबर घेतले पाहिजे .त्यांना चळवळीत आणि मुख्य प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे .

यावेळी सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे ,दलित साहित्य आणि आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा.डॉ.मिलिंद कसबे ,दलित स्वंवसेवक संघाचे माजी संघप्रमुख रमेश राक्षे ,वंचित बहुजन आघाडीचे वरीष्ठ नेतें वसंत साळवे ,लेखक डॉ.सोमनाथ कदम ,मुक्ता साळवे साहित्य परिषदेचे अध्यक्ष सोपान खुडे ,अंकल सोनवणे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले .

यावेळी आंबेडकरी चळवळीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल रमेश राक्षे यांचा सप्तनिक विशेष सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमास पुणे शहरातील विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . या कार्यक्रमाचे आयोजन मुक्ता साळवे साहित्य परिषदेने केले होते .