शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळविणाऱ्यांच्या घरापुढे आंदोलन करणार – ॲड यशोमती ठाकूर

अमरावती : गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पात झालेली लाखो रुपयांच्या विद्यूत साहित्याची चोरी हा सर्वस्वी सरकारी अनास्थेचा भोंगळ कारभार आहे. सरकारने शेतकरी आणि सरकारी यंत्रणेवर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळविणाऱ्यांच्या कार्यकारी अभियंता यांच्या घरापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचे अमरावतीच्या माजी पालकमंत्री तथा आमदार ॲड यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे.

तिवसा जलसंपदा विभागांतर्गत अमरावती- नागपूर महामार्गालगत अप्पर वर्धाच्या मुख्य कालव्याच्या बाजूला गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या वॉटर लिफ्टिंगकरिता असणारी स्वतंत्र विद्युत पुरवठा यंत्रणा फोडून लाखोंचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले. रात्रपाळीत चौकीदार नसल्याची संधी अज्ञात चोरट्यांनी साधली. खरिपातील कपाशी व तूर या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने तयारी सुरु असतानाच अचानक चोरट्यांनी रोहित फोडले. त्यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. दुसरीकडे, रब्बी हंगामातील शेकडो हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन प्रकल्पाच्या आशेवर असून त्यासाठी जलसंपदा विभागाने पाणी फिरवले आहे, असा आरोप ॲड यशोमती ठाकूर यांनी केला आहे.