शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा अपघात, बरगडीला दुखापत; श्वास घेण्यास त्रास

नवी दिल्ली- ‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachachan) यांचा शूटिंगदरम्यान अपघात झाला आहे. हैदराबाद येथे एका चित्रपटातील अॅक्शन सीन शूट करताना अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली असून त्यांच्या उजव्या बरगडीचे स्नायू फाटले (Amitabh Bachachan Accident) आहेत. स्वत: अमिताभ बच्चन यांनी याबद्दल माहिती दिली आहे.  बिग बींच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, ‘हैदराबादमध्ये प्रोजेक्ट केच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीन शूट केला जात होता. यादरम्यान माझा अपघात झाला. अपघातानंतर शुटिंग रद्द करण्यात आली आहे. डॉक्टरांनी तपासणी केली आणि हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयातील डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं आहे. आता मी घरी परतलो आहे. आता काळजी करण्याचं कारण नाही. पण प्रचंड त्रास झाला. हलण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत होता.

पुढे बिग बी म्हणाले, ‘प्रकृती स्थिर होण्यासाठी काही आठवडे लागतील. वेदना होत असल्यामुळे डॉक्टरांनी औषधं दिली आहेत. त्यामुळे जी कामे आहेत, ती काही दिवसांसाठी थांबवण्यात आली आहेत. मी आता जलसामध्ये आराम करत आहे. काही महत्त्वाचं काम असेल तरच चालत आहे.’

दरम्यान ‘प्रोजेक्ट के’ हा अॅक्शनपट आहे. नाग अश्विनने याचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची रिलीज डेट 12 जानेवारी 2024 आहे. हा एक जबरदस्त अॅक्शन चित्रपट आहे, ज्यामध्ये उच्च पातळीवरील अॅक्शन पाहायला मिळणार आहे. असाच एक अॅक्शन सीन शूट करताना अमिताभ बच्चन जखमी झाले आहेत.