‘पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिराजी कुठे आणि सभेला १०० लोक जमले नाहीत म्हणून पळणारे मोदी कुठे?’

मुंबई : पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत आज घडलेल्या गंभीर घटनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

पाटील म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर वर्षभर निवडणूक लांबवून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत राज्यपालांवर खापर फोडण्याचा त्यांच्या आघाडीचा प्रयत्न म्हणजे नौटंकी होती. नाना पटोलेंच्या राजकीय आयुष्यात नौटंकीचे अनेक प्रसंग आहेत. नौटंकी हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेस सरकारकडून गंभीर चूक झाली असताना त्याला नौंटकी म्हणणे निषेधार्ह आहे. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी नाना पटोले यांनी तोंड सांभाळून बोलावे.

यावर आता नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘चंद्रकांतदादा, पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिराजी गांधी कुठे आणि सभेला १०० लोक जमले नाहीत म्हणून पळणारे मोदी कुठे? चीनचे नाव घ्यायला घाबरणारे मोदी कसले जागतिक नेते? त्यामुळे खरा नौटंकीबाज कोण हे जगाला माहित आहे.’ असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.