अमोल कोल्हे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुयायी आहेत – कवाडे

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी ‘मैंने गांधी को क्यों मारा’ (Why I Killed Gandhi) या चित्रपटाच्या माध्यमातून नथूराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

दरम्यान, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. कॉंग्रेस नेत्यांनी तर या चित्रपट प्रदर्शनास विरोधही दर्शवला होता.यानंतर अमोल कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. परंतु, राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या विविध चर्चा काही थांबल्या नाहीत. राज्यातील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश केला.

दरम्यान, यासर्व घडामोडी घडत असताना आता पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी कोल्हे यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुयायी आहेत. त्यांच्या पक्षाने जरी त्यांच्या चित्रपट आणि भूमिकेचे समथर्न केलेले असले तरी आम्ही कोणत्याही स्थितीमध्ये या चित्रपटाचे राज्यात प्रदर्शन होऊ देणार नाही, असे कवाडे यांनी आज पत्रकार बैठकीत सांगितले.

कवाडे म्हणाले, खा. कोल्हे यांनी चित्रपटामध्ये गांधी हत्येचे समर्थन करीत असताना गोडसे प्रवृत्तीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादीतील केवळ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. राज्य शासनाने या वादग्रस्त चित्रपटावर बंदी घालावी अशी आमची मागणी आहे,असेही प्रा. कवाडे यांनी सांगितले. राज्य सरकारने जर राज्यात चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली तर आम्ही त्यास विरोध करू असा इशारा कवाडे यांनी दिला.