“मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही दिसतंय, कारण…”, अमोल मिटकरींचा टोला

Mumbai – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरला सुरू होणार आहे. तत्पूर्वी नव्या शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता होती. परंतु सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नामुळे मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोमणा मारला आहे.

नाव न घेता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याची आठवण काढत अमोल मिटकरी म्हणाले, ‘कुणीतरी म्हणत होत की अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तो होणार नाही असं दिसतय. कारण ज्या दिवशी हा विस्तार होईल त्या दिवशी सरकार कोसळेल असे भाजपच्याच अनेक नेत्यांचे मत आहे.’

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, “महाविकास आघाडीचं सरकार जाईल असं कुणालाही वाटत नव्हतं. मात्र, अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळलं. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा”, असं म्हटलं होतं.