धर्मांचं आवरण देऊन आनंद दिघे धमक्या, खंडणी,समांतर न्यायालयं असे सगळे उद्योग करत होते – वागळे 

 मुंबई – राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात धर्मवीर(Dharmveer)  या सिनेमाची चर्चा होताना दिसून येत आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने(prasad oak) आनंद दिघेंची(Aanand dighe) भूमिका साकारली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद दिघेंची ओळख होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास उलगडणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे(Praveen tarade)  यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. एका बाजूला या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसऱ्या बाजूला जेष्ठ पत्रकार निखील वागळे(Senior journalist Nikhil Wagle)  यांनी आनंद दिघे यांच्याबाबत केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.

आनंद दिघे कोण होते? या शीर्षकाखाली लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, सिनेमा कुणीही काढू शकतं. पांढरा किंवा काळा पैसा हवा त्यासाठी. दाऊद, अरुण गवळी, वरदराजन मुदलीयार, विरप्पन यांच्यासारख्या अनेक खलनायकांवर सिनेमे निघाले. आता आनंद दिघेंवर निघतोय. काल साताऱ्याला जाताना या सिनेमाची प्रचंड होर्डिंग्ज पाहिली. दिघे शिवसैनिकांमध्ये लोकप्रिय होते हे खरं, पण तसे दाऊदपासून विरप्पनपर्यंत सगळेच आपल्या अनुयायांचे देव होते. अर्थात, त्यांचा धंदा कायदेशीर होता असं कुणीही म्हणणार नाही. आनंद दिघेंचाही व्यवहार कायदेशीर नव्हता. धर्मांचं आवरण देऊन ते धमक्या, खंडणी, समांतर न्यायालयं असे सगळे उद्योग करत होते. श्रीधर खोपकर (Sridhar Khopkar) यांच्या निमित्ताने राजकीय खुनबाजीही त्यांनी घडवून आणली. ते टाडाखाली तुरुंगातही गेले. दिघेंची बुवाबाजी एवढी वाढली की ते स्वतःला ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख किंवा धर्मवीर म्हणवून घ्यायला लागले. स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी यावर आक्षेप घेतला होता.

आनंद दिघेंवर सिनेमा काढण्याचा अधिकार त्यांच्या अनुयायांना नक्कीच आहे. पण खोटा इतिहास दाखवण्याचा नाही. नाहीतर तुमच्यात आणि काश्मीर फाईल्समध्ये काहीच फरक नाही. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर शिवसैनिकांनी सिंघानिया हॅास्पिटल (Singhania Hospital) जाळलं हेसुद्धा विसरु नका. पूर्वी महानगरमध्ये मी आनंद दिघेंच्या कारवायांबद्दल अनेकदा लिहिलंय. आज सिनेमाचा विषय आला म्हणून हे बोलावं लागलं. भलत्या गोष्टींचं उदात्तीकरण नको. आज सत्तेत असलेल्यांनी तर ते अजिबात करु नये. सत्तेत बसून राडा घालता येत नाही! म्हणूनच मला कुमार नेगे(Kumar nege) , विश्वंभर चौधरी यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. सत्य सांगण्याची हिंमत दाखवल्याबद्दल. कारण आनंद दिघेंची दहशत मला ठाऊक आहे. असं वागळे यांनी म्हटले आहे.