पंडित जवाहरलाल नेहरूंनी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी माफी मागितली होती, भाजपा नेत्याचा दावा

नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा (BJP) आक्रमक झाली असून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ काढत त्यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. राहुल गांधीच्या सावरकरसंबंधी विधानावर भाजपा नेत्यांकडून सातत्याने टीकेचे ताशेरे ओढले जात आहेत. अशातच आता भाजपा नेते आणि केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनीही राहुल गांधींवर सडकून टीका करत दावा केला आहे की, पंडित जवाहरलाल नेहरुंनी (Pandit Jawaharlal Nehru) तुरुंगातून सुटका मिळवण्यासाठी माफी मागितली होती.

राहुल गांधींवर निशाणा साधत अनुराग ठाकूर यांनी दावा केला की, पंजाबमधील जालियनवाला बाग हत्याकांडानंतर झालेल्या आंदोलनात अटक झाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी माफी मागितली होती.

लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये ‘भारतीय मीडिया पूर्णपणे ध्रुवीकरण झाला आहे का?’ या विषयावर बोलताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, राहुल गांधी कधीच सावरकर होऊ शकणार नाहीत. कारण सावकरांनी तुरुंगात अपार त्याग आणि कष्ट केले होते. जर तुम्ही एखाद्याचा आदर करू शकत नसाल तर किमान त्यांचा अपमान करू नका.

अनुराग ठाकूर यांनी पुढे नाभा तुरुंगात नेहरूंनी माफीनामा पत्र लिहिल्याचा दावा केला. या पत्रात त्यांनी असे लिहिले होते की, ते कोणत्याही आंदोलनात भाग घेण्यासाठी प्रदेशात परतणार नाहीत. नाभा तुरुंगातील एका फलकानुसार, नेहरू यांचे संतनम आणि एटी गिडवानी यांना 22 सप्टेंबर 1923 रोजी नाभाच्या संस्थानात प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

तसेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना त्यांच्या “कधीही माफी मागणार नाही” या टिप्पणीबद्दल टोमणा मारला आणि त्यांनी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात (“चौकीदार चोर है” टिप्पणीबद्दल) माफी मागितली होती, असेही म्हटले.