‘एसटी कामगारांच्या नावावर भाजप आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे’

शरद पवार यांच्यासारख्या हिमालयाच्या उंचीच्या नेत्याच्या घरावर असा हल्ला करणं योग्य नाही

मुंबई – कालचा संपूर्ण दिवस एसटी कर्मचारी आणि त्यांच्या आंदोलनामुळे गाजला. काल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली . यावेळी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या आहेत.

एसटीच्या विलीनीकरणात (ST workesrs) शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारामतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.

या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलं आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजूंनी चिखलफेक होत असून या प्रकरणावर महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी देखील भाष्य केले आहे.

एसटी कामगारांच्या नावावर भाजप आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पवार यांच्यासारख्या हिमालयाच्या उंचीच्या नेत्याच्या घरावर असा हल्ला करणं योग्य नाही. राष्ट्रपती राजवट आणि शपथविधीची स्वप्नं पाहत राहा, ही महाराष्ट्राची जनता आहे, तुम्हाला आता मरेपर्यंत या मातीत स्थान मिळणार नाही.
एसटी कामगारांच्या सर्व प्रश्नांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, या प्रश्नावर न्यायालयाने आपला निर्णय दिलेला आहे. आपण सर्वांनी संयम बाळगला पाहिजे.असं आवाहन ठाकूर यांनी केले आहे.