आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण परत करावा, कुणी केली मागणी?

खारघर- ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा सोहळा दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी खारघर (नवी मुंबई) येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला सुमारे राज्यभरातून २० लाख अनुयायी उपस्थित होते. सोहळ्यादरम्यान अनेक अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाला. तब्बल ७ तास लाखांहून अनुयायी उन्हात होते. अनेकांना चक्कर आली, अनेकांना उलट्यांचा त्रास झाला. या दुर्दैवी घटनेत १४ निष्पाप अनुयायांचा नाहक बळी गेला.

या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, शिंदे-फडणवीस सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागण्या विरोधकांकडून करण्यात येत आहेत. मात्र आता अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी ही मागणी केली आहे.

काय म्हणाले सचिन खरात?
सचिन खरात म्हणाले, ‘ महाराष्ट्र राज्यातर्फे देण्यात येणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार यंदा जाणीवपूर्वक आरएसएस या संघटनेचे कट्टर समर्थक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला परंतु पुरस्कार प्रदान करताना उष्माघातामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला हे अत्यंत निंदनीय आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आम्ही आठवण करून देत आहे की, ज्यावेळेस ज्येष्ठ मराठी अभिनेते निळू फुले यांना माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी फोन करून सांगितले होते की आपल्याला महाराष्ट्रभूषण पुरस्कारसाठी आपली निवड केली आहे.’

‘त्यावेळेस अभिनेते निळू फुले मुख्यमंत्र्यांना म्हणाले, मी या पुरस्कारासाठी पात्र होण्यास कोणत्याही पराक्रम केला नाही.. उलट पोटापाण्याची सोय म्हणून मी अभिनय करतो आणि माझ्यामुळे समाजाला कोणताही फायदा झाला नाही.. उलट अशा माणसाला पुरस्कार द्यावा जो समाजासाठी काम करतो याची आठवण ठेवून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा.’ अशी मागणी यावेळी सचिन खरात यांनी केली आहे.