आयपीएल ट्रॉफी विजेता कर्णधार धोनीच्या गुडघ्याची झाली सर्जरी, पुढील हंगामात खेळणं…

एमएस धोनीच्या (MS Dhoni) गुडघ्यावर शस्त्रक्रिया (MS Dhoni Knee Surgery) करण्यात आली आहे. आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. 30 मे रोजी आयपीएलचा समारोप होताच धोनीने मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात जाऊन त्याच्या गुडघ्याची तपासणी केली. 31 मे रोजी गुडघ्याची तपासणी केल्यानंतर 1 जून रोजी सकाळी त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

संपूर्ण आयपीएल हंगामात धोनीच्या गुडघ्याची दुखापत चर्चेत राहिली. 31 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या लीगमधील पहिल्याच सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती. पण, चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवण्याचा ध्यास असा होता की धोनीला त्याच्या गुडघ्याची पर्वा नव्हती. मात्र, यादरम्यान असे चित्र मैदानावर अनेकवेळा पाहायला मिळाले, ज्यावेळी धोनी कधी-कधी वेदनांनी व्हिवळताना दिसला.

जाणून घ्या कोणत्या डॉक्टरने केले धोनीचे ऑपरेशन?
मिळालेल्या माहितीनुसार, धोनीचे ऑपरेशन डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला यांनी केले आहे. डॉ.पार्डीवाला हे सेंटर फॉर स्पोर्ट्स मेडिसिनचे प्रमुख असून त्यांनी ऋषभ पंतच्या शस्त्रक्रियेतही मोठी भूमिका बजावली होती. धोनी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर सध्या रुग्णालयात आहे.

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुढील हंगामात खेळण्याची आशा 
धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता त्याच्या पुढच्या सत्रात खेळण्याची आशाही निर्माण झाली आहे. आयपीएल 2023 च्या फायनलनंतर धोनीला विचारण्यात आले की हे त्याचे शेवटचे आयपीएल आहे का? यावर तो म्हणाला होता की, ही सर्वोत्तम वेळ आहे, पण चाहत्यांनी त्याला या सीझनमध्ये जे प्रेम दिलं आहे, त्यानंतर तो त्यांना भेट देऊ इच्छितो. त्याला पुढील हंगामातही खेळायला आवडेल.

गुडघा पूर्णपणे फिट होण्यासाठी पुरेसा वेळ
धोनीची ती इच्छा आता पूर्ण होऊ शकते. त्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे. आणि, यातून सावरण्यासाठी लागणारा वेळ अजूनही पुरेसा आहे. धोनीने स्वत: सांगितले होते की, त्याच्याकडे पुढील हंगामाचा निर्णय घेण्यासाठी 6 ते 7 महिने आहेत. त्यामुळे इतक्या कमी वेळात गुडघे टेकणे काय असते हे CSKच्या कर्णधाराला चांगलेच कळेल.