पिंपरी-चिंचवड शहराप्रमाणे ‘शास्ती’माफीचा निर्णय सर्व शहरांतील नव्याने सामील गावांसाठी लागू करा

नागपूर – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांना ‘शास्ती’माफी देण्याचा निर्णय तातडीने अंमलात आणावा. ‘शास्ती’माफीचा निर्णय सुस्पष्ट असेल, त्यात प्रशासकीय त्रूटी राहणार नाहीत, नागरिकांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. पिंपरी-चिंचवडप्रमाणे राज्यातील सर्व महापालिकांसाठी ‘शास्ती’माफीचा हा निर्णय लागू करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.

विधानसभा नियम १०५ अन्वये सादर करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभागी होताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांच्या ‘शास्ती’माफीचा प्रश्न सुटणे आवश्यक होते. तो आता सुटला आहे. याच बरोबरीने राज्यातल्या अन्य शहरांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचाही सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे. महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी गावांमध्ये असलेल्या बांधकामांना अवैध ठरवण्यात आले. या गावांसाठीही ‘शास्ती’माफीचा निर्णय होऊन तिथे सोयीसुविधा वेगाने उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.