निर्दोषत्व सिद्ध करता येत नसल्याने जितेंद्र आव्हाड वेडेचाळे करतायेत: आशिष शेलार

मुंबई  – राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका महिलेने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला  आहे. या घडामोडीनंतर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे.

दरम्यान, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याच्या मुद्द्यावरुन आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी डिवचले आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतर आम्ही पोटनिवडणुकीत त्यांचा मतदारसंघ जिंकू, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणे आणि त्यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा यांचा काय संबंध आहे. जितेंद्र आव्हाड निर्दोष असतील तर त्यांनी कायदेशीरपणे आपली बाजू लढवावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानात प्रत्येकाला निर्दोषत्त्व सिद्ध करण्याची मुभा आहे. जेव्हा निर्दोषत्त्व सिद्ध करता येत नाही तेव्हा असे वेडेचाळे केले जातात. आव्हाडांच्या राजीनाम्याचा आणि त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा काहीही संबंध नाही. जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. आम्ही ती जागा जिंकू, असे आशिष शेलार यांनी म्हटले. त्या

नेमकं काय घडलं ?
मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा हा सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित एका महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि ती महिला हे आमने-सामने आले आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून ‘काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलल्याचा आरोप करत  त्या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला.