भारतीय क्रिकेटरची सुपरमार्केटमधील कर्मचाऱ्याला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) ही मोठ्या अडचणीत सापडू शकते. सुपरमार्केटमध्ये खरेदी करताना तेथील कर्मचाऱ्यासोबत भांडण करून त्याला मारहाण केल्याचा राजेश्वरीवर आरोप आहे. राजेश्वरी ही कर्नाटकातील विजयपूर येथील एका सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी गेली होती. यावेळी तेथील कर्मचाऱ्याशी वस्तूंच्या किमतीवरून तिचा शाब्दिक वाद झाला. त्यानंतर मात्र राजेश्वरीने मित्रांसह कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना सुपरमार्केटमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र अद्याप राजेश्वरीने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

माध्यमांतील वृत्तांनुसार, राजेश्वरी विजयपूर येथील एका सुपरमार्केटमध्ये कॉस्मेटिक खरेदी करण्यासाठी गेली होती. यादरम्यान तिचा सुपरमार्केटच्या कर्मचाऱ्याशी वाद झाला. यानंतर तिने काही ओळखीच्या लोकांसह सुपरमार्केटमध्ये घुसून कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फुटेज शेअर करताना सुपरमार्केटच्या मालकाने पोलिसांकडे तक्रार करण्याचे ठरवले होते, पण नंतर दोन्ही पक्षांनी शांततेने प्रकरण मिटवले.

दरम्यान राजेश्वरी ही भारतीय महिला संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. तिने भारताकडून ६४ वनडे सामने खेळले असून ९९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी२० क्रिकेटमध्ये ४४ सामने खेळताना ५४ विकेट्स तिच्या नावावर आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र तिला फक्त २ सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये तिने ५ विकेट्स घेतल्या आहेत.