INDvsPAK: राखीव दिवशीही सामना रद्द झाल्यास वाढतील भारताच्या अडचणी, फायनलमध्ये पोहोचणे होईल कठीण

IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात सुरू असलेल्या आशिया चषकाच्या सुपर फोर सामन्यावर पावसाचे काळे ढग दाटले आहेत. काल (१० सप्टेंबर) केवळ २४ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने सामना राखीव दिवशी म्हणजेच आज घेण्याचा निर्णय झाला. मात्र आजही पावसाचा व्यत्यय येत आहे. परिणामी राखीव दिनीही (Reserve Day) जर पावसामुळे खेळ झाला नाही तर काय होईल, याचा भारतीय संघाला फायदा होईल की नुकसान असे प्रश्न चाहत्यांना पडू लागले आहेत.

कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर १० सप्टेंबर रोजी उभय संघांमधील सामना सुरू झाला परंतु भारतीय डावादरम्यान पावसामुळे खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तोपर्यंत टीम इंडियाने २१.१ षटकात २ गडी गमावून १४७ धावा केल्या होत्या. आता हा सामना ११ सप्टेंबरला पूर्णपणे खेळवला जाणार आहे पण या दिवशीही कोलंबोमध्ये पावसामुळे सामना रद्द होण्याचा धोका आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील या सामन्यात पावसाचा धोका लक्षात घेता आशियाई क्रिकेट परिषदेने राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सोमवारीही पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही, तर भारतीय संघाला अंतिम फेरी गाठणे थोडे कठीण होऊ शकते. हा सामना रद्द झाल्यास भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण दिला जाईल. अशा स्थितीत २ सामन्यांनंतर पाकिस्तानचे ३ गुण होतील. तर भारतीय संघाच्या खात्यात १ गुण असेल.

अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला शेवटचे दोन सामने जिंकावे लागतील

आशिया चषक २०२३ मधील सध्याच्या पॉइंट टेबलवर नजर टाकल्यास पाकिस्तान सध्या २ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे ज्यामध्ये त्यांचा नेट रन रेट १.०५१ आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका संघ आहे, ज्यांचे एका सामन्यात २ गुण आहेत परंतु त्यांचा नेट रन रेट ०.४२० आहे.

भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या खात्यात अद्याप एकही सामना जमा झालेला नाही. तर बांगलादेश संघ शेवटच्या स्थानावर आहे ज्याने सुपर-४ मध्ये आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला आहे. भारताला पाकिस्तानविरुद्ध गुणांची वाटणी करायची असेल, तर थेट अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना १२ आणि १५ सप्टेंबर रोजी होणारे सामने जिंकणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या-

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, पगार 47,900 रुपयांपर्यंत असणार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख; अवघ्या १४ महिन्यात १३,००० हुन अधिक रुग्णांना ११२ कोटी १२ लाखांची मदत वितरित