विधानसभा पोटनिवडणूक : चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे

पुणे : जिल्ह्यात २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम सुरू असून त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. यानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात ३ लाख १ हजार ६४८ पुरुष, २ लाख ६४ हजार ७३२ स्त्री आणि ३५ तृतीयपंथी याप्रमाणे एकूण ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार संख्या आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत ४८ हजार १०६ ची वाढ झाली आहे.

२१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात १ लाख ३६ हजार ८७३ पुरुष, १ लाख ३८ हजार ५५० स्त्री आणि ५ तृतीयपंथी याप्रमाणे २ लाख ७५ हजार ४२८ याप्रमाणे मतदार संख्या आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत १५ हजार २५५ ची घट झाली आहे.

अंतिम मतदार यादीतील मतदारसंख्येच्या आधारे २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे तर २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी ५१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.