Assembly Election Results :  मतमोजणी सुरू होण्यापूर्वी योगी, चन्नी, रावत यांच्यासह अनेक नेत्यांनी केली प्रार्थना

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज होणार असून मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

एक्झिट पोलनं उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि मणिपूरमध्ये भाजपची सरशी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्ता मिळवेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. उत्तराखंड आणि गोव्यात काट्याची टक्कर आहे आणि तिथं त्रिशंकू स्थितीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान,  उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबसह 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज येत आहेत. पाचही राज्यांमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीपूर्वी अनेक नेते पूजापाठ करून विजयासाठी आशीर्वाद घेत आहेत. सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूक निकालाकडे लागल्या आहेत आणि सर्वांच्या नजरा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गजांवर आहेत. निवडणूक निकालापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंदिरात पोहोचून प्रार्थना केली.

दुसरीकडे पंजाब विधानसभेचे निकालही आज येत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी निवडणूक निकालापूर्वी रोपर येथील गुरुद्वारामध्ये दर्शन घेतले. पंजाबमध्ये काँग्रेसने चरणजित सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आहे. तर येथे आम आदमी पक्षाने भगवंत सिंह मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार केले होते. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. येथे बहुमताचा आकडा ५९ आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी प्रार्थना केली आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये निकराची लढत आहे.उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार की काँग्रेसचा विजय हे आजच्या मतमोजणीनंतर ठरणार आहे. उत्तराखंडच्या हॉट सीट खातिमावर सर्वांचे लक्ष लागले आहे, जिथून राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे भुवन कापरी आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यावेळी लालकुआनमधून नशीब आजमावत आहेत.