यूपी-उत्तराखंडमधील पहिला कल आला, जाणून घ्या 5 राज्यांमध्ये कोणता पक्ष पुढे आहे

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज होणार असून मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

एक्झिट पोलनं उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि मणिपूरमध्ये भाजपची सरशी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्ता मिळवेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. उत्तराखंड आणि गोव्यात काट्याची टक्कर आहे आणि तिथं त्रिशंकू स्थितीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, सुरुवातीचे कल प्रथम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधून आले. दोन्ही राज्यात भाजपला आघाडी मिळाली आहे. पहिल्या पाच मिनिटांत भाजपने 8 जागांवर आघाडी घेतली. तर उत्तराखंडमध्ये भाजपला 5 जागांवर आघाडी मिळाली आहे. सुरुवातीचे ट्रेंड खूप वेगाने पुढे जात आहेत.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून भाजपला पुन्हा सत्तेत आणले तर असे करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरतील. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री असतील. योगी मुख्यमंत्री झाले तर 2007 नंतर ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढणारे पहिले नेते असतील.