पवार साहेबांच्या घरावरील हल्ला हे पोलीस यंत्रणेचे अपयश, मास्टरमाईंडचा शोध घेतला जाईल : अजित पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक  या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात मश्गुल आहेत. दरम्यान, ‘हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार म्हणाले की, ‘मला आश्चर्य वाटत की दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलन यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता. हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. पोलिसांना हे आधी कसं कळलं नाही. तिथे जाणारे आंदोलक मीडियाला घेऊन पोहचले. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं. मग मीडियाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही.’

अजित पवार म्हणाले की, ‘पोलीस विभाग या मागच्या सूत्रधाराचा शोध घेतील. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली. त्यामागे कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलीय. आम्ही आंदोलकांसोबत आणि संघटनांसोबत अनेकदा बैठकी घेतल्या आहे. पण नंतर एसटी कर्मचारी संघटनांचं देखील ऐकत नाही आहेत. त्यांनी तारतम्य सोडलं, जी भाषा वापरण्यात आली ती आपल्या संस्कृतीत बसत नाही. पोलीस यंत्रणा याचा तपास करुन यामागे कोण मास्टरमाईंड आहे याचा शोध घेतील.’