विधान परिषदेला गुप्त मतदान, मविआचे उमेदवार पराभवाच्या छायेत ?

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

या निकालामुळे महाविकास आघाडीसमोर आगामी  विधान परिषदेची निवडणूक अवघड होण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी होणारे गुप्त पद्धतीचे मतदान ही महाविकास आघाडी सरकारसाठी आणखी एक डोकेदुखी ठरू शकते. राज्यसभा निवडणुकीत केवळ अपक्षांना गुप्त पद्धतीने मतदान करण्याची मुभा होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक आमदाराचे मत गुप्त राहणार आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटातील नाराज आमदारांची भाजपकडून फोडफोडी होण्याची दाट शक्यता आहे.

विधानपरिषदेत गुप्त पद्धतीने मतदान झाल्यास महाविकास आघाडीचे आमदार भाजपच्या (BJP) उमेदवारांना मत देण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे विधान परिषद निवडणूक एका अर्थाने महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याच्या दृष्टीने अग्निपरीक्षा ठरू शकते.