गुणरत्न सदावर्तेंना अटक होताच जयश्री पाटलांचा पवारांवर गंभीर आरोप

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक ( Congress leaders oppose attack on Sharad Pawar house ) या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. काल घडलेल्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून मुंबई पोलिसांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. हे सगळे शरद पवार यांचेच कारस्थान आहे, असा आरोप त्यांनी केली आहे. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांना वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस जे. जे. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. आम्हाला अद्याप एफआयआर दाखवला नाही, असाही आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.