पावसाळ्यात पाझर तलावात पाणी भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल – अजित पवार

पुणे : पुणे जिल्हा परिषद (Pune Zila Parishad) व पुणे नाम फाऊंडेशन (NaMa Foundation Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा गाळमुक्त ल.पा.योजनेअंतर्गत बारामती तालुक्यातील पाझर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या हस्ते भिलारवाडी येथे करण्यात आला. पावसाळ्यात परिसरातील धरणातील पाणी सोडावे लागत असताना पाझर तलाव भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग कांजाळकर, स्नेहा देव, नाम फाऊंडेशनचे मल्हार पाटेकर, गणेश थोरात आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, पाझर तलावातील गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घेऊन जावा. तसेच पावसात पुन्हा गाळ तलावात येणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याचे प्रमाण कमी असते. म्हणून या भागातील ल.पा.योजनेतील गाळ काढण्यात येणार आहे. ११४ ल .पा. योजनेतील गाळ काढण्याचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम नाम फाऊंडेशनच्या मदतीने हाती घेण्यात आला आहे. पाझर तलावातील पाणी जमिनीत मुरल्यास परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढेल. सामाजिक बांधिलकी म्हणून नाम फाऊंडेशनने यात घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या योजना योजना मंजूर केल्या आहेत. पुढील २५ वर्षातील गरज लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना दिवसा किंवा रात्री वीज पुरवठा देण्यात येईल यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येत आहे. मान्सून वेळेपूर्वीच येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर आवश्यक बाबी वेळेवर मिळाव्यात यासाठी नियोजन करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.

परिसरातील विकासकामांसाठी सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सौर पंपाद्वारे पाणी देण्याबाबत योजना तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून त्याबाबत सहकार्य करण्यात येईल, असेही श्री.पवार म्हणाले.

यावेळी आयुष प्रसाद म्हणाले, नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने पाणी टंचाई क्षेत्रातील ११४ पाझर तलावातील गाळ काढण्यात येणार असून जिल्हा परिषद सेस फंडातून १ कोटी २२ लक्ष रुपये डिझेलसाठी देण्यात येणार आहे. नाम फाऊंडेशनकडून जेसीबी व पोकलंड यंत्रण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे. उर्वरीत गाळ गायरान जमिनीवर आणि सामाजिक वनीकरण क्षेत्रावर टाकण्यात येणार आहे. भूजल पुनर्भरणासाठी ३०३ रिचार्ज शाफ्ट बांधण्यात येत आहेत. नवीन पाणी साठवण संरचनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

गाळ काढण्यामुळे पाण्याचा साठा वाढेल आणि भूजलस्तर वाढण्यास मदत होईल. गाळ काढण्यात येणाऱ्या तलाव परिसरातील १०३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जल जीवन मिशनच्यादृष्टीने याचा लाभ होण्यासोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ५ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना गाळ काढण्याचा थेट लाभ होईल. पुढील २० ते २५ दिवसात गाळ काढण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

थोरात यांनी यावेळी नाम फाऊंडेशनच्या कामाची माहिती दिली. गाळ काढण्यासाठी सर्व प्रकारच्या यंत्रांची मदत फाऊंडेशनतर्फे करण्यात येईल. नाम फाऊंडेशनच्या कामात युवकांचा चांगला सहभाग मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, पुणे जिल्हा सह.बँकेचे संचालक संभाजी होळकर, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.