ताल, स्वर व लयींच्या झंकाराने पुणेकर रसिकांची सायंकाळ प्रफुल्लित

पुणे  : ताल, स्वर, लयींचा प्रफुल्लित करणारा आविष्कार आणि हलक्या थंडीसोबतच उत्तरोत्तर रंगत जाणारी सायंकाळ पुणेकर रसिकांनी १४ व्या स्वरझंकार संगीत महोत्सवाच्या निमित्ताने अनुभविली. व्हायोलिन अकादमीच्या वतीने आयोजित व बढेकर ग्रुप प्रस्तुत यावर्षीच्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गायिका नबनिता चौधरी यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मधुवंतीने आपल्या गायनाला सुरूवात केली.(News of the 14th Swarzhankar Sangeet Festival).

राग मधुवंतीमधील ‘सखी कैसे जाऊं’ ही बडा ख्याल मधील बंदिश आणि ‘फुल बंध सेज बिछाऊ…’ ही रचना त्यांनी छोटा ख्यालमध्ये सादर केली. त्यानंतर तराणा सादर करीत ‘भक्ती की रसना श्याम नाम है, प्रेम की रसना राधा…’ या भजनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) तर आदिनाथ वैद्य आणि दिव्या श्रीकांत यांनी तानपुरा अशी साथसंगत केली.

यानंतर सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं विजय घाटे यांची संकल्पना असलेला ‘मेलोडीक रिदम विथ सेल्वा गणेश’ (Melodic rhythm with Selva Ganesh) हा अनोखा कार्यक्रम सादर झाला. तालवाद्ये, कथक व तबला यांची जुगलबंदी यावेळी उपस्थितांनी अनुभविली.

स्वर-राग प्रधान कार्यक्रम अनेक महोत्सवात सादर होतात मात्र आमच्या सारख्या कलाकारांना लय-ताल प्रधान कार्यक्रम सादर करण्याची वेगळी संधी मिळत नाही. म्हणूनच आम्ही एकत्र येत आमचा विचार मांडायचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे करीत असल्याचे घाटे यांनी नमूद केले आणि आयोजकांनी ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

सुप्रसिद्ध खंजिरावादक सेल्वा गणेश, तबला वादक पद्मश्री पं विजय घाटे आणि कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर (Selva Ganesh, Padmashri Pt Vijay Ghate and Kathak dancer Sheetal Kolwalkar) यांनी सादर केलेल्या या कलाविष्काराला रसिकांनी टाळ्यांचा भरभरून प्रतिसाद दिला.

दुर्गा स्तुतीने या सादरीकरणाची सुरवात झाली. त्यानंतर गणेशवंदना, कृष्णवंदना, भजन, श्लोक, तबला सोलो आणि कथकमधून सवाल- जवाब यांचे दमदार सादरीकरण झाले. अभिषेक शिनकर (संवादिनी), नागेश आडगावकर (गायन), सागर पाटोकर (पढंत) आणि निलेश यादव (ध्वनी) यांनी साथसंगत केली.

कालपासून (दि. ५ जानेवारी) सुरू झालेला स्वरझंकार संगीत महोत्सवात ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ. मीता पंडित यांच्या सुरेल गायनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. त्यांनी राग भीमपलासने आपल्या गायनाला सुरूवात केली. ‘अब तो बडी बेर…’ ही विलंबित ख्याल बंदिश, धानी रागातील ‘साडे नाल वे…’ ही पंजाबी रचना व त्यानंतर तीन तालातील तराणा त्यांनी प्रस्तुत केला. ‘केसरिया बालम….’ ही राजस्थानी लोकसंगीतातील लोकप्रिय रचना सादर करीत त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली. भरत कामत (तबला) व मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), निशिगंधा देशपांडे व ऋतुराज कोळपे (स्वरसाथ व तानपुरा ) यांनी समर्पक साथसंगत केली.

यानंतर राहुल शर्मा यांचे बहारदार संतूरवादन झाले. त्यांनी राग जनसंमोहिनीने वादनाला सुरवात केली. आलाप, जोड, झाला, रूपक तालात एक मध्यलय रचना व तीनतालात द्रुत रचनेचे दमदार सादरीकरण त्यांनी केले. पहाडी धून सादर करीत त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. आदित्य कल्याणपूर यांनी त्यांना तबालासाथ केली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू व राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांच्या ‘द राहुल देशपांडे कलेक्टीव्हस’ या लोकप्रिय कार्यक्रमाद्वारे झाला. ‘मी वसंतराव’ चित्रपटातील ‘पवन चलत…’ ही बंदिश, मीर तकी मीर यांची ‘पत्ता पत्ता बुटा बुटा हाल हमारा जाने है ‘ ही गाजलेली गझल, आरती प्रभू यांची ‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे’ ही रचना, राग गोरख कल्याण’ मधील ‘मोगरा फुलला ‘ अशा एकाहून एक सरस राहुल यांनी सादर केल्या. निखिल फाटक (तबला), अमर ओक (बासरी), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), रोहन वणगे (वेस्टर्न रिदम) आणि अतुल रानिंगा (कीबोर्ड ), रितेश ओहोळ (गिटार), मनीष कुलकर्णी ( बेस गिटारिस्ट) यांनी यावेळी साथसंगत केली.