“चंद्रशेखर बावनकुळे आहेत महाराष्ट्राचे, पण दिसतात वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे”, ठाकरे गटाकडून जोरदार टीका

ठाणे- शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना फडतूस संबोधल्याने बराच गदारोळ झाला. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ठाकरेंना प्रत्युत्तर देत फडणवीसांना पुन्हा पातळी सोडून अशी टीका केल्यास मातोश्री बाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला होता. आता बावनकुळेंच्या या वक्तव्याच्या समाचार घेताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना रंगावरुन सुनावले आहे.

ठाण्यात बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे आहेत, पण दिसतात वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे. बावनकुळे पॅट्रिक पॅटरनसारखे दिसतात का तर नाही. ब्रायन लारासारखे दिसतात का तर नाही. मग, ते कोणासारखे दिसतात, तर वेस्ट इंडिजचे खेळाडू अ‍ॅब्रोससारखे दिसतात. जुन्या लोकांना माहिती आहे, कर्ली अ‍ॅब्रोस कसे दिसत होते.”

“तुम्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे दिसता. पण, ते खेळाडू होते, तुम्ही कोणाबरोबर खेळताय, उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव ठाकरे तुम्हाला एका चेंडूत आऊट करतील, पत्ता सुद्धा लागणार नाही,” असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.