कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवण्याचे बिचकुलेंचे संकेत; दोन दिवसात मोठा निर्णय घेणार 

कोल्हापूर – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. भाजपने ही निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली असून महाविकास आघाडी देखील ही जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा सामना होईल असे वाटत असताना शिवशक्ती सेनेकडून करुणा शर्मा-मुंडे आणि आम आदमी पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. विशेष म्हणजे या सर्वाना टक्कर देण्यासाठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले सुद्धा मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. याबाबत बिचुकले यांनीच तसे संकेत दिले आहेत. TV9 मराठी सोबत बोलताना ते म्हणाले,  कोल्हापूर उत्तरबाबत दोन दिवसात निर्णय घेणार आहे. कलाकार असल्याने जयप्रभा स्टुडिओ, कलाकारांचे प्रश्न घेऊन निवडणुकीत उतरणार. मी येतोय असे म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतोय, अशी कोल्हापूरमध्ये चर्चा आहे, अशी प्रतिक्रिया अभिजित बिचुकले यांनी दिली आहे.

कोल्हापूरमध्ये मंदिर सोडले तर विकास झाला नाही. पुण्या-मुंबईच्या तुलनेत विकास झाला नाही. नेत्यांनी स्वतःची खळगी भरली, लोकांना वाऱ्यावर सोडले. आता बघू काय परिस्थिती निर्माण होते, असे ते म्हणाले. तसेच मी अधिकृत घोषणा केली नसताना चर्चा होतेय. लोकाग्रहास्तव काहीतरी भूमिका मांडू. वरळी, कडेगावमध्ये मी गेल्यामुळेच निवडणुका लागल्या. टक्कर तर देईन. माझ्या इमेजचा फायदा मला होईल, मी काय करू शकतो याचा अंदाज आता जनतेला आला आहे. बेरोजगारी, महिलांचे सबलीकरण या विषयावर येत्या काळात लढा उभारू, असेही ते म्हणाले.