एस.टी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा, विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय येण्याची शक्यता !

मुंबई : इतिहासातील सर्वाधिक काळ सुरु असलेल्या एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १४ हजार गाड्या स्थानक आणि आगारात उभ्या आहेत. दोन हजार गाड्यांच्या माध्यमातून राज्यात केवळ दहा टक्के एसटी फेऱ्या सुरू आहेत. आज, मंगळवारी संपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी असून एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळणार का, याकडे जवळपास लाखभर एसटी कर्मचाऱ्यांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रीसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर झाला आहे. या अहवालात नेमके काय आहे हे आज स्पष्ट होईल. यामुळे तूर्त या प्रकरणी बोलणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका एसटी महामंडळाने घेतली आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय घडतं यावर एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.