‘महाविकास आघाडीला १७० आमदारांचा पाठिंबा, आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत आहोत’

 माढा  – आपली पक्ष संघटना संपूर्ण पारदर्शक होईल असे काम करा… संघटना क्रियाशील आणि ताकदवान झाली पाहिजे… पक्ष नेतृत्वाचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत जाईल अशी यंत्रणा उभी करा असा आदेशच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माढा येथील सभेत दिला.

आमदार बबनदादा शिंदे यांचे एकही काम, एकही मागणी अपूर्ण राहत नाही. राज्यातील मंत्री दादांची प्रत्येक मागणी पूर्ण करतात. मी अर्थमंत्री होतो तेव्हा सिना बोगदा मंजूर केला होता आणि त्याला भरीव निधी दिला गेला होता. पाण्यासाठी एक मोठे काम बबनदादांच्या मागणीनुसार झाले आहे. यापुढे या भागात पाण्याची कोणताही प्रश्न प्रलंबित ठेवला जाणार नाही असे आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांना माढा तालुक्याने नेहमीच सहकार्य केले आहे, यापुढे कराल याची मला खात्री आहे. राष्ट्रवादीचे हात आणखी बळकट करण्यासाठी संघटना मजबूत करा. माढा लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार  निवडून येईल यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

महाविकास आघाडीच्या निमित्ताने १७० आमदारांचा पाठिंबा आपल्याला आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय महाविकास आघाडी घेत आहे. या सगळ्यात सर्वसामान्यांची साथ हवी असेही जयंत पाटील म्हणाले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार बबनराव शिंदे यांनी आपले विचार मांडले.