आगामी जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणूकीत यश मिळण्यासाठी एकदिलाने काम करा – जयंत पाटील

पंढरपूर   – येत्या काळात जिल्हा परिषदा आणि नगरपरिषद निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये आपल्याला यश आणायचेच आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदिलाने काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ संवाद यात्रेत केले.

पंढरपूरमध्ये आपल्या हातातला विजय निसटला आणि पराभव हाती मिळाला. वातावरण आपल्या बाजुने असताना इथे पराभव कसा झाला. प्रत्येक ठिकाणी बुथ कमिट्या असत्या तर हा पराभव झाला नसता. पराभव झाला तो ठिक आहे. पराभव कुणाचा होत नाही इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता परंतु पराभव झाल्यावर संघटना नीट ठेवण्याची जबाबदारी होती. आपल्यासाठी झटणाऱ्या लोकांसाठी किती प्रयत्न केला याचा अभ्यास केला पाहिजे असेही जयंत पाटील म्हणाले.

पराभव का झाला याचे कारण आपल्याला माहीत असताना आपण काम करायला हवे. भारतनाना भालके यांचे काम खुप मोठे आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभेल असेल काम आपण करायला पाहिजे. नाना नेहमीच ३५ गावाच्या प्रश्नांसाठी माझ्याकडे यायचे अशी आठवण सांगताना आज ती योजना पूर्णत्वास आली आहे. लवकरच योजना येईल आणि या भागातील ३५ गावांच्या कामाचा प्रश्न सुटेल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

या भागाचा आणखी विकास आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला या भागात राष्ट्रवादीची ताकद अधिक वाढवावी लागेल. आज आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात आहे, याआधी कशी काही परिस्थिती नव्हती. कोरोनाच्या काळात देशभरात महाराष्ट्राने चांगले काम केले, जागतिक पातळीवर याची दखल घेतली गेली. त्यामुळे महाराष्ट्राला आपली गरज जास्त आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भगीरथ भालके आदींनी आपले विचार मांडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष प्रताप गंगेकर, नगरसेवक अक्षय गंगेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेतील दुसरी सभा पंढरपूर मतदारसंघात पार पडली. या सभेनंतर जयंत पाटील यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले.