नवी मुंबई – शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यापासून त्यांना इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा वाढत चालला आहे. यासंदर्भात नवी मुंबईतील काही माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेत पाठिंबा दिला होता. मात्र त्यातील तीन नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. दरम्यान, शिंदे गटातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नुकतेच सरकार स्थापन झाले असताना शिंदे गटाचे नगरसेवक पळवून गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राजकीय अपरिक्वता दाखवली, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नवी मुंबईतील प्रमुख विजय चौगुले (Vijay Chaugule) यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीत एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येण्याची चिन्हे दिसत असतानाच नगरसेवक फोडणे योग्य नाही. त्यामुळे भविष्यातील आम्ही दिलेले धक्के गणेश नाईक यांना भारी पडतील, असा इशारा शिंदे गटाकडून देण्यात आला आहे.
त्यांचं टायमिंग चुकलं. आम्हालाही माहिती होतं की तो (गवते) जाणार आहे. पण त्यांनी आत्ता या गोष्टी घडवून आणायला नको होत्या. त्यांना हे करायला भरपूर वेळ होता. महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडतंय, त्या पार्श्वभूमीवर राजकीय परिपक्वता असणाऱ्या माणसाने या गोष्टी करणं चुकीचं आहे”, असं चौगुले प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.