आदित्य ठाकरेंनी उभारलेला ‘तो’ लोखंडी पूल वाहून गेला

नाशिक : शिवसेनेत सध्या उभी फुट पडल्याने पक्ष वाचवण्यासाठी सध्या ठाकरे पितापुत्र प्रयत्न करत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे (Former Minister Aditya Thackeray) हे विविध ठिकाणी जाऊन शिवसैनिकांच्या सोबत संवाद साधत आहेत. मात्र आता आदित्य ठाकरे जरा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत.

काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारने नाशिकमध्ये उभारण्यात आलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. हा पूल बांधल्यावर आदित्य ठाकरे यांचे मोठे कौतुक झाले होते मात्र आता हा पूलच वाहून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे उभारण्यात आलेला पूल वाहून गेला. येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी या पूलाची खूप मदत होती. परंतु, आता हा पूलच वाहून गेल्याने शेंद्रीपाड्यातील नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे.विशेष म्हणजे या लोखंडी पुलाच्या उदघाटनासाठी स्वतः आदित्य ठाकरे आले होते.